Total Pageviews

Saturday, January 24, 2009

ती पालवी...

- मनस्विनी लता रविंद्र

( सकाळचे आठ-साडेआठ वाजतात. तो अंथरुणातून उठून बसतो. शेजारी ती अजूनही गाढ झोपेत- तो तिला उठवू लागतो.)

तो : उठ... शोनड उठा... उठ उशीर होतोय... मी अर्ध्या तासात निघीन हं आवरून...

ती : एक दोन मिनिटं. दोन सेकंद प्लीज... माझे डोळेच उघडत नाहीयेत.

तो : नंतर माझ्यावर चिडचीड करायची नाही कळलं. मी माझं काम केलंय, तुला उठवायचं.

ती : अँू तू पण नको जाऊस, मी पण नाही जात. आपण दिवस लोळत काढू मस्त...

तो : आता आलीये तुला जाग... मी चहा ठेवतो तोपर्यंत उठ... ओके?

ती : (अंथरुणात उठून बसते. पण डोळे मिटलेलेच आहेत. त्याचा हात पकडून त्याला थांबवते.) मला काय दिसतंय सांगू? एक खूप मोठ्ठं कुलूप आहे... ज्याला गंज लागलाय... त्या कुलपाच्या छिदातून एक पालवी बाहेर आली आहे... आणि मग तू येतोस मागून सोबत... आशूदादा आहे... त्याचा दाद किडलाय म्हणून तो डेण्टिस्टच्या खुचीर्त बसलाय... आणि तू मात्र बरमुडा घालून हवाईयन पद्धतीचा शर्ट घालून शीळ घालत फिरतोयस... मी मागून येते तर डॉक्टरांनी आशूदादाचा दात काढलाय... तो खूप किडलाय... मी नाचत तुझ्याजवळ येतं आहे... आणि हत्ती... बापरे केवढा मोठ्ठा हत्ती... आशूदादा...

तो : मला रोज रोज स्वप्न नको सांगत जाऊस... सकाळी सकाळी एखादी अगम्य फिल्म बघितल्यासारखं वाटतं.

ती : (डोळे उघडते) ऊँ नको जाऊस नां... पण मला एक कळत नाहीये आशूदादाचा दात का किडलेला दिसला मला?

तो : तो किडका दात म्हणजे कुजलेल्या समाज व्यवस्थेचं प्रतीक असेल.. ज्यात राहून राहून तो कंटाळलाय... तो गेला नव्हता का सुट्टी काढून अभयारण्यात त्यामुळे तुला असं वाटलं असेल... ती सलणारी खुपणारी गोष्ट त्याने काढून टाकली.

ती : हूँ... म्हणूनच हत्ती पण दिसला मला... आणि तू हवाईयन कपड्यात... हं... तू हवाईयन कपड्यात दिसलास कारण मला असं सबकॉन्शसली वाटत असणार की आपण पण फिरायला जावं कुठेतरी...

तो : आपण जाऊ ना, पण त्यासाठी तुला दात घासून, आंघोळ करून तयार व्हावं लागेल...

ती : आणि ऑफिसला जावं लागेल... शी बाबा... एक दिवस आरामात जात नाही...

तो : असं तू रोज म्हणतेस आणि उशीर झाला की मला शिव्या घालतेस, मला थांबवलं का नाहीस बडबडीपासून...

ती : आज नाही घालणार.

तो : म्हणजे उशिरा जायचंय तुला ऑफिसला?

ती : नाही उलट साडेनऊला पोहोचायचं होतं...

तो : ओ शीट. मूर्ख - मूर्ख आहेस तू... आता कसं शक्य आहे तुला पोहोचवणं... तू तू दहा मिनिटात आवर. मी पटकन ऑम्लेट टाकतो. ते खा आणि... नाही नाही ट्रेनमध्येच खा...

ती : अरे मला उशीर झालाय आणि तू हायपर का होतोयस? ऐक ना...

तो : किती आरामात बोलते आहेस तू? हं, बोल पण पटकन...

ती : आशूदादा सुट्टी काढून अभयारण्यात फिरायला गेला, आपण एक सुट्टी काढून नॅशनल पार्कला जाऊ नये म्हणजे काय?

तो : नाही सुट्टी वगैरे शक्यच नाही.

ती : बिग डिल रे...

तो : तुला इतकं सोपं वाटतंय पण तसं नाहीये एक सुट्टी म्हणजे कळतंय तुला?

ती : भांडायचंय का आपण आता?

तो : मला नाही शक्य.

ती : का?

तो : नॅशनल पार्क नाही आवडत मला.

ती : मग कुठे मरीन ड्राइव्ह?

तो : नको.

ती : घरीच मस्त आराम करायचा?

तो : चालेल. पण कुलपातून पालवीचा काय अर्थ असेल???

( दोघं हसतात)

No comments: